Friday, August 23, 2013

काळे फेसबुक, काळे स्टेटस, काळे झेंडे, काळे कपडे 
काळा दिवस, काळी रात्र, काळही काळाच 
सर्वत्र काळोख, काळोखावर काळ्याचेच आक्रमण 
चर्चा अहोरात्र काळोखाच्या काळेपणाची…. 

सगळेच सरसावलेत काळोख मिटवायला 
बाहेर काही काळ - "प्रकाश"
पण अंतर्मनातील ज्योत कधी पेटणार??
तोपर्यंत प्रकाशही आभासी…. काळाच… 

दिनेश निसंग, पुणे, २२ ऑगस्ट २०१३

Wednesday, August 21, 2013

हताश… व्यथित…


आजूबाजूला बहुतांश अर्ध्या हळकुंडाने पिवळे,
लाटेवर स्वार होणारे,
ज्यांनी ईश्वराचे अस्तित्वच नाकारले त्यांच्याचसाठी ईश्वराकडे शांतीची प्रार्थना करणारे…

तुमचे विचार खूपच चांगले,
मात्र त्यांना पाठींबा बाहेरून, तो हि अंतर्मनातून,
होय, 'आम्ही परिवर्तनवादी' दाखवण्याचा नुसताच अट्टाहास

मैं  हू  अण्णा, मैं  हू  दाभोलकर,
सगळेच क्षणभंगुर तरंग,
विचारांची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची  पायमल्ली…
निषेध, मोर्चा, बंद, सभा, मेणबत्त्या, टोप्या,
'विचार' प्रत्यक्ष जगण्यात उतरवताना मात्र हजारो पळवाटा….

तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अमर रहे …
माणसे मरतात, विचार मरत नाहीत…
अरे हो पण, त्या सोबत जिवंत माणसेही जगत नाहीत…

कर्वे, आगरकर, फुले, आमटे, बंग या व्यक्तीचं कार्य महान
शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात
स्वत:वर वेळ आल्यावर सोयीस्कर डोळेझाक…

'पुरोगामित्व' समूहात मिरवणारे
दाखवण्याचा चेहरा खासगीत उतरविणारे…
'विचार' जागणारा मात्र उरतो एकटाच… एकटाच ….

- दिनेश निसंग, पुणे, २१ ऑगस्ट २०१३